शेकोटी ' शेतक-यांचा खरा सोबती (मिलिंद गड्डमवार) - साहित्य जत्रा

Breaking

Monday, January 14, 2019

शेकोटी ' शेतक-यांचा खरा सोबती (मिलिंद गड्डमवार)


  ● ' शेकोटी ' शेतक-यांचा खरा सोबती !  

             जी स्वतः जळते अनं दुस-यास ऊब देते ती ' शेकोटी '. शेकोटी चे महत्व थंडीच्या दिवसात कळते. गरीबांच्या अंगातील थंडी घालविण्याचे काम शेकोटीच करीत असते. शेकोटी ही लाकडी भुसा, धानाचा कोंडा,शेणाच्या गोव-या व लाकडी ओंडक्याला जाळून पेटविल्या जाते. शेतकऱ्यांचे थंडीपासूनचे  खरे रक्षण ही  शेकोटीच ऊब देऊन करीत असते. शेतातील पीक राखण करण्यासाठी अंधाऱ्या रात्री, थंडीच्या दिवसात शेतक-यांची खरी सोबत,पाठराखण ही शेकोटीच करीत असते. पंचतारांकित हॉटेल मध्ये सुध्दा थंडी घालविण्यासाठी आणि वातावरणातील आर्द्रता कमी करण्यासाठी शेकोटीचाच सहारा घेतला जातो.मग ती एक साॅफेस्टीकेटेड  लोकांची  फॅशन ठरत असते. या गोष्टींचा वापर करून सिनेमातील गॅम्लर हे वाढविण्यात येते.यासाठी करोडो रूपयांचा खर्च करण्यात येतो. सिनेमा जगतातील ग्लॅमरसात यामुळे भर पडते.
               खुल्या निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या वातावरणात शेत पीकांची थंडीच्या दिवसात राखण करतांना माळरानावर, शेतातील मचाणीवर लोखंडी पातेल्यात,  मातीच्या भांड्यात किंवा घमेल्यात पेटती निखारे टाकून लाकडी ओंडक्याची,शेणाच्या  गोव-याची बारीकसारीक तुकडे टाकून शेकोटी ही पेटवली जाते. यामागे थंडीपासून स्वतःचा बचाव करणे हाच एकमेव हेतू असतो. शेतातील  शेकोटीचा वापर हा स्वयंपाक करण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी, गव्हाचा, ज्वारीचा हुर्डा भाजण्यासाठी, भरीतासाठी वांगे भाजण्यासाठी करण्यात येतो. शेतातील पीकांचे हिंस्र प्राण्यांपासून,जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी याच शेकोटीचा आधार घेतला जातो.यांस शेतातील ' जागर ' असे संबोधीले जाते.
      भर थंडीत सकाळच्या प्रहरी जोंधळ्यातील दाणे टिपण्यासाठी पोपटाची (राघू) टोळधाड शेतात वावरत असते. त्यांना पिटाळून लावण्यासाठी शेतक-यांचा संघर्ष हा निरंतर चालू असतो. तेंव्हा सुध्दा अवकाळी पाऊस व थंडीपासून संरक्षण करण्याचे काम ही शेकोटीच करीत असते. शेतीतील गहू,जोंधळा, हरभरा यांचे पीक जोमात असतांना पक्षांपासून पीकांचे संरक्षण करणे हे जोखमीचे काम असते. अनेकदा थंडीच्या दिवसात शेकोटी ही  ऊबदार वाटत असल्याने शेणाच्या गोवरीची व पेटलेल्या कोळशाची ऊब केंव्हा जीवघेणी ठरेल हे सांगता येत नाही. कधी कधी झोपेच्या धुंदीत अनेक शेतकऱ्यांची पाठ व पोट भाजल्या गेल्याचे दृश्य मी प्रत्यक्ष स्वतः अनुभवलेले आहे. तो प्रसंग अत्यंत भयावह व मन हादरवून टाकणारा असतो. हे सगळे
आठवण्याचे कारण आपण या सर्व बाबींपासून अनभिज्ञ झालेलो आहोत. आपणांस फक्त शेतीतील  साफ-सुथरे धान्यच दुकानात  नजरेस पडते आहे. याकरीता लागणारे श्रम काय असतात याची जाणीव नविन पिढीला करून देणे आवश्यक झालेले आहे. याच कष्टी जीवनाचा शेतकरी हा अविभाज्य घटक असल्याने त्याच्या शेतमालाची किंमत योग्य पध्दतीने करून त्याचे जीवन सुखमय कसे होईल यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे.
              शेतात प्रत्यक्ष  राबणारा शेतकरीवर्ग हा सुखी झाल्याशिवाय देशात शांतता प्रस्थापित होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ' शेकोटी ' हे संघर्षाचे प्रतिक ठरते आहे. शेकोटी जसे स्वतःस जाळून घेऊन दुस-यास ऊब देते तसा शेतकरीवर्ग हा दुस-यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, सुखा- समाधानासाठी जळतो आहे, झटतो आहे हे कदापी विसरून चालणार नाही . याची जाणीव ठेवून प्रत्यक्ष  व्यवहारात वागणे आणि त्याच्या मालाची रास्त किंमत त्याला कसे प्राप्त होईल यावर लक्ष केंद्रित करणे यातूनच  माणुसकीचे खरे दर्शन घडणार आहे. शेतीला त्याचे नंबर एकचे स्थान परत मिळवून देणे हा केंद्र सरकारच्या धोरणाचा एक भाग झाला पाहिजे. तरच भारत जगात महासत्ता म्हणून आपले स्थान प्राप्त करू शकणार आहे.
                        
 □ मिलिंद गड्डमवार, राजुरा
                              जिल्हा-चंद्रपूर
                              भ्र.क्र ९५११२१५२००

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages