जागतिक मातृदिन - साहित्य जत्रा

Breaking

Sunday, May 10, 2020

जागतिक मातृदिन




Image
  ॲनाची आई म्हणाली होती की,मला आशा आहे की कधीतरी कोणीतरी आईचा निस्वार्थीपणा, प्रेम आणि असिम त्यागाचे आभार मानण्यासाठी एक दिवस तिच्या नावावर करेल. आईचे हेच वाक्य ॲनाने खरे करण्यासाठी आईच्या मृत्यूनंतर १९०८ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेतील ॲना मेरी जर्विस यांनी मदर्स डे साजरा केला. तिला जीवन जगण्यासाठी आईपासून प्रेरणा मिळाली होती. याबाबत ॲनाने लोकांना सांगितले होते की, हा असा दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही घरी जा आणि तुमच्या आईला वेळ द्या. आतापर्यत तुम्ही जे आहात ते तिच्यामुळे त्यासाठी तिचे आभार माना. ॲनाने मदर्स डे साजरा केल्यानंतर १९११ पर्यत अमेरिकेतील अनेक ठिकाणी मातृदिन साजरा केला जात होता. मात्र, थॉमस विल्सन यांनी १९१४ मध्ये अधिकृत घोषणा केल्यानंतर तो मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी साजरा केला जाऊ लागला.

      या दिवशीची सार्वजनिक सुट्टी आपल्या आईसोबत साजरी करावी, आईवर असलेलं प्रेम साजरं करण्यासाठीचा दिवस. जगभरात आईचे प्रेम, त्याग याबद्दलची कृतज्ञता या दिवशी व्यक्त केली जाते. पाश्चिमात्य देशांमध्ये या दिवशी एकत्रित येऊन आईचे आभार मानले जातात. संपूर्ण दिवस तिच्यासोबत घालवातात. आईला भेटवस्तू देणे, तिच्यासाठी जेवण करणे अशा पद्धतीने ‘मदर्स डे’चे सेलिब्रेशन या हेतूने अमेरिकेपुरती मर्यादित ही घोषणा होती, त्यानंतर सर्वत्र हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. आज मे महिन्यातील दुसरा रविवार. म्हणजेच जागतिक मातृदिन. समस्त मातांना जागतिक मातृदिनानिमित्त प्रणाम!!!!

      आपली भारतीय संस्कृती तर मुलांना लहानपणापासूनच ‘आई माझा गुरू, आई कल्पतरु’ अशी शिकवण देते. त्यामुळे या एका दिवसाने विशेष असा फरक पडणार नाही. कारण आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई सुद्धा जिची महती लिहायला अपुरी पडेल, आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नसून ती समाज स्थिर आणि सुरक्षित ठेवणारी एक संस्थाच आहे. कित्तेक अनाथांची ती नाथ आहे, ती समर्पणाची परिसीमा आहे. ती आहे असं एक न्यायालय की जिथे सर्व गुन्हे माफ होतात. ती सूर्याप्रमाणे प्रखर आहे. ती चंद्राप्रमाणे शीतल आहे. मिणमिणत्या प्रकाशाने सतत तेवत राहून कित्तेक आयुष्य उज्ज्वल करणारी वात आहे. भूकेल्याचा घास आहे, हरलेल्याची आसं आहे, थकल्या - भागल्या जीवाचा श्वास आहे...ती आहे साऱ्या विश्वाचा गर्भ...साऱ्या सुखांचा संदर्भ! कितीही कविता झाल्या...लेख लिहून झाले तरी तिला कोणीही आपल्या चिमटीत पकडू शकत नाही अशी सूक्षमातिसूक्ष्म आणि स्थुलातिस्थूल आहे ती. ती कधी ज्ञानेशाची रसाळ वाणी आहे तर कधी तुकोबाची परखड तिखट टिपण्णी आहे. कुठेच दिसणार नाही अशा रत्नाची रेलचेल तिच्या उदरात आहे...कोणीही बहाल करू शकणार नाही अशा पुरस्काराची चावी तिच्या पदरात आहे.अशा आईसाठी एक दिवस पुरेसा होईल का ? असा प्रश्न पडतो.

    मातृदिन साजरा करा किंवा मदर्स डे साजरा करा, परंतु आपल्या आईबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करा. खरं तर आई – वडीलांच्या रोज पाया पडून त्यांच्या बद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणारी आपली भारतीय संस्कृती.

    "आपल्या जन्म आणि दीर्घायुष्यासाठी, आपल्या मातेचे कष्ट व त्याग हे आम्हावर ऋण आहे! या ऋणातून अंशतः का होईना, मुक्त होण्यासाठी आपण दररोज आपल्या मातेची सेवा करु या, मातेचे पांग फेडू या ! हे पांग फिटण्यासाठीच आपण घरोघरी दररोज मातृ दिन साजरा करु या !".

   माझ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जडणघडणीत जिच्या घामाने भिजलेले संस्कार रुपी वलय आहे अशी माझी देवकी कुशिवर्ता आणि जिने माझ्या बालमनाला शिस्तीचे पैलू पाडले ती माझी यशोदामैय्या कै.संगीता...माझ्या दोन आया दोघींनाही आणि तसेच पृथ्वीतलावावरील मनुष्य असो वा प्राणी प्रत्येक मातेला मातृदिनानिमित्त प्रणाम !!! तुमच्याच आशीर्वादाने घडत आहे, भारत मातेची सेवा करून प्रत्येक मातेच्या ऋणामधून थोड्याप्रमाणात उतराई होण्यास बळ देण्यासाठी तुम्ही तुमचे आशीर्वाद सदैव सोबत ठेवा...


 

4 comments:

  1. हेच खरे समर्पण आहे आईसाठी .....
    Happy mother's day😍😍💕

    ReplyDelete

Thank You For Visit and Comment

Pages