आज बाबासाहेब असते तर...! ( मिलिंद गड्डमवार) - साहित्य जत्रा

Breaking

Sunday, January 6, 2019

आज बाबासाहेब असते तर...! ( मिलिंद गड्डमवार)

                     आज बाबासाहेब असते तर...! 

       
           भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे
त्यावेळेच्या अछूत भारतीयांना पडलेले एक सुंदर स्वप्नच. हे स्वप्न वास्तवात आणणे हे महाकठीण काम होते. चिखलात कमळ फुलत असले तरी सुध्दा चिखलाचा साधा डाग कमळावर दिसून येत नाही. तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तळागाळातील व्यक्तीमत्व .भारतीय राजकारणात सगळीकडे वावरत असतांना अनेक यातना, पीडा सहन करून सुध्दा कुणाप्रती व्देषभाव निर्माण होईल असे कृत्य त्यांच्या हातून घडले असेल असे वाटत नाही.डाॅ.आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी इंग्लिश राजवटीला नावे न ठेवता इंग्लिश राजवटीचा वापर आपल्या बांधवांसाठी सकारात्मक पध्दतीने कसा करून घेता येईल यावर भर दिला. आपल्या समाजातील लोकांची स्थिती सुधारण्यावर डाॅ.बाबासाहेबांचा विशेष भर होता. राजकारण करणे हा बाबासाहेबांचा पिंडच नव्हता. बाबासाहेबांच्या अद्वितीय विद्वत्तेचे  सा-यांनाच आकर्षण पडले होते. त्यांच्या विद्वत्तेचा फायदा देशाला करून घेण्यासाठीच त्यावेळेच्या काँग्रेस मधील लोकांनी घटनापिठावर बाबासाहेबांची नियुक्ती करण्याचे ठरविले असावे.
                डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण ६ डिसेंबर १९५६ ला दिल्लीला  झाले. आज त्यांच्या महानिर्वाणाला ६२ वर्ष पुर्ण होऊनही जातीधर्मातील संघर्ष हा कमी झालेला आढळून येत नाही. याचे कारण राजकारणात दडलेले आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन जाती व्यवस्थेशी संघर्ष करण्यात घालवले.जाती व्यवस्था नष्ट व्हावी म्हणून त्यांनी घटनेत अनेक तरतुदी करून देशात  समान नागरी कायदा कसा अस्तित्वात येईल यावर घटनेत भर दिलेला आहे. असे असतांना आपल्या राजकीय नेतृत्वाने  याकडे कायमचे दुर्लक्ष करून जातीवर आधारीत मतांवर  विशेष भर देऊन ते अजून पक्के कसे होतील याकडे लक्ष दिले. याचा वाईट परिणाम जातीव्यवस्था अजून भक्कम होण्यात झाला. निवडणूका ह्या विकासाच्या मुद्यावर न लढता जाती-धर्मावर लढून जनतेचा विश्वासघात केलेला आहे. हा एकप्रकारे राज्य घटनेचा अपमानच आहे. याबाबत कुणीही बोलत नाहीत. विचार करून अंमलबजावणी करणे तर दूरच राहिले. जाती-धर्माचा आधार घेऊन निवडणुका लढणे हे घटनाबाह्य कृत्य ठरते आहे.
             भारतातील निवडणूका ह्या जाती- धर्मावरच लढविल्या जातात हे उघड  सत्य लपून राहिलेले नाही.  जातीनिहाय मतदारसंघ व लोकप्रतिनिधी  दिल्याने निवडणूकीच्या आखाड्यात मतांसाठी जातीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे .मतदारसंघात कोणत्या जातीचे प्रतिनिधित्व जास्त आहे, तो गडगंज संपत्तीवाला आहे किंवा नाही हे तपासूनच उमेदवार हा दिला जातो. याचा अत्यंत वाईट परिणाम भारतीय राजकारणावर झालेला आहे . आजही अनुसूचित जाती-जमाती वर्गातील उमेदवार राखीव मतदारसंघ वगळता  स्वतंत्ररीत्या निवडणुकीत निवडून येवू शकत नाही. मग तो कितीही चांगला कार्यकर्ता,  उमेदवार असला तरीही. आजही जनता  कार्यकर्त्यांच्या सामाजिक व लोकोपयोगी  कामांकडे पाहून मतदान करीत नाहीत किंवा निवडणुकीत निवडून देत नाहीत तर घराणेशाहीची जोपासना करण्यास हातभार लावीत असतात अन  स्वतःला धन्य समजत असतात. याचा अर्थ अजूनही आमच्या रक्तातून मांडीलकी ही गेलेली नाही. डाॅ.बाबासाहेबांना हे मान्य नव्हते. आमच्या लोकांनी स्वबळावर राजसत्तेत प्रवेश करावा आणि स्वाभिमानाने राज्यकर्ते व्हावे अशीच त्यांची इच्छा होती. यासाठीच त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन, स्वतंत्र लेबर पार्टी व भारतीय रिपब्लिकन पार्टी या पक्षाची स्थापना  केली. आता रिपाई चे अनेक शकले पडून गटागटात ही पार्टी विखुरल्या गेल्याने समाजाची वज्रमुठ ही विस्कळीत  झालेली असल्याने सत्तासुंदरी ही दूर गेलेली आहे. गटागटाच्या राजकारणाने देशातील  राजकारणाचे केंव्हा गटारात रूपांतर झाले हे जनतेला कळले सुध्दा नाही. भारतीय जनता यातून धडा घेईल तो सुदिन म्हणावा लागेल.
               सध्या आरक्षणाच्या मुद्याने देशातील राजकारण ढवळून निघालेले आहे. भारतीय संविधानातील नियमांचे पालन न केल्याने देशातील गरीब व कष्टकरी लोकांच्या राहणीमानात कुठलिही सुधारणा न होता ती गंभीर झाल्याने देशातील प्रश्न अधिकच  बिकट बनलेले आहेत. आता जो तो आरक्षणाची मागणी रेटून धरीत आहे. केंद्र सरकारला आरक्षणाचा  प्रश्न कसा सोडवावा असा यक्षप्रश्न पडलेला आहे. यावरून चाललेले देशातील राजकारण कोणत्या थराला जाईल हे आताच सांगता यायचे नाही. भारताला तरूणांईचा देश म्हणून जगमान्यता प्राप्त आहे. परंतू राजकीय निर्णयात तरूणांईची भागीदारी ही अत्यल्प वाटते आहे.भारतीय राजकारणात कपट नितीचा अजूनही वापर केला जातो आहे. जनता यापासून अनभिज्ञ राहत असल्याने व गरीब जनता पैशाला,आमिषाला बळी पडत असल्याने  लोकतंत्रात्मक व्यवस्थेचे वाटोळे झालेले आहे. बेरोजगारीच्या प्रश्नांकडे व शेती व्यवसायाकडे  सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष  झाल्याने आरक्षणाचा आधार जनता शोधू पहाते आहे. जे चुकीचे आहे. आरक्षणाचा आधार जात नसून मागासलेपण आहे हे कुणीच मान्य करण्यास तयार नाहीत. आम्ही कसे मागासलेले आहोत हे सांगण्याची चढाओढ लागलेली आहे. आज मागासवर्गीय आयोगाला काम देण्याचे काम जनता इमानेइतबारे करीत  आहे.
                आज बाबासाहेब असते तर व्यक्ती पुजेवरून, पुतळ्यावरून, समाधी स्थळावरून चाललेले राजकारण पाहून या देशात जीवंत लोक राहतात काय असा प्रश्न त्यांना पडला असता. एकीकडे निर्जीव पुतळ्यावरून राजकारण जोरात चाललेले आहे. स्वतःची वैचारिक उंची न वाढविता आल्याने आपल्या  बौनी वृत्तीचे प्रदर्शन करून पुतळ्याच्या उंचीवरून राजकारण साधले जात आहे.जनता याचा विरोध करून  रस्त्यावर उतरतांना  दिसून येत नाही. तरूणांच्या हातांना काम व रोजगार  देण्यासाठी या पैशाचा वापर होणे गरजेचे असतांना या देशाची तरूणांई रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करून सरकारी मालमत्तेचे नुकसान करीत आहेत. खरा प्रश्न आपण भारतीय केंव्हा होणार हाच असायला पाहिजे.परंतू जातीय राजकारणाने देशाचे अपरिमित नुकसान केलेले आहे. आज बाबासाहेब असते तर जनतेवर नामुष्कीची पाळी आलीच नसती. राजकारणातील नितीमुल्य हरविले कारणाने जनतेला वाईट दिवस पहावे लागत आहेत. भारतीय राजकारणात पुन्हा नितीमुल्यांचे जतन करणे आवश्यक झालेले आहे. लोकशाही प्रक्रियेतील प्राण ' नितीमुल्य ' हरविल्याने जनतेचे महत्व हे फक्त निवडणूकीपुरतेच शिल्लक  राहिलेले आहे. याचा विचार करून जनतेने पुढील सुधारात्मक  पाऊल न उचलल्यास देशात अराजक माजण्यास वेळ लागणार नाही. जनता ही सार्वभौम आहे हेच आजचे राज्यकर्ते विसरलेले आहेत. आजचे लोकप्रतिनिधी हे निवडून आल्यानंतर एखाद्या राजासारखे वागतात. त्यांच्या संपत्तीत भरमसाठ वाढ होते आहे .तरी जनता प्रश्न विचारीत नाही. त्याचाच हा परिणाम आहे. हे जनतेने लक्षात घेऊन वागावे. जनतेचा देशास्वाभिमान जागृत झाल्याशिवाय भारतात ख-या अर्थाने लोकशाही नांदू शकणार नाहीत  हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना चांगले ज्ञात होते. घटना राबविणारे लोक जोपर्यंत स्वकेंद्रीत आहेत,स्वतःच्या पक्षाचा व पक्षातील लोकांचाच विचार करणारे आहेत तोपर्यंत जनतेचा विकास साध्य  होणे शक्य नाही हे ध्यानात घेतले पाहिजेत.

                        □ मिलिंद गड्डमवार, राजुरा
                             जिल्हा-चंद्रपूर
                             भ्र.क्र ९५११२१५२००
             

No comments:

Post a Comment

Thank You For Visit and Comment

Pages