मनुष्य हा सवयीचा गुलाम असतो असे म्हटले जाते. आमचे आजोबा आंम्हाला नेहमी म्हणायचे ' लवकर निजे लवकर ऊठे ' त्याला चांगले ज्ञान व आरोग्य प्राप्त होत असते. जुन्या काळात आखाडे होते. आखाड्यात व्यायाम करणे याला तालीम म्हणतात. आखाड्यात शिकविणारे गुरूजी हे शिरसावंद्य असत. गुरुजींची आज्ञा हा अंतिम शब्द असे. आजकाल आखाड्याची जागा जीम ने घेतलेली आहे. आजचे महागडे जीम हे बाॅडी बिल्डिंग चे काम करीत अाहेत. जीम मध्ये जाऊन व्यायाम केल्याने शरीर पिळदार बनते. परंतु जीम बंद केले की ते शरीर पुर्ववत होते. शरीराला जशी सवय लावाल तसे ते बनत असते. रात्री उशिरा झोपणे व सकाळी सुर्य डोईवर आल्यावर उठण्याचा प्रघात सध्याच्या पिढीत दिसून येतो आहे. याचे बरेवाईट परिणाम या पिढीला भोगावे लागणार आहेत.
सैन्य शिस्त ही अंगी बाणणे आज गरजेचे वाटते आहे. कारण चांगल्या सवयी या आपोआप लागत नाहीत. त्या महत प्रयासाने अंगी बाणाव्या लागतात. शारिरीक शिक्षण हा विषय शाळेतून हद्दपार केल्याने मुलांना व्यायामाची सवय ही राहिलेली नाही. आज लहान सहान मुलांचे शरीर हे अगडबंब, स्थूल असलेले पहावयास मिळते आहे. फास्ट फूड, जंकफूड खाण्याचा हा परिणाम आहे असे डाॅक्टर मंडळी सांगतात. आळसाने आज मनुष्याच्या शरीराचा संपूर्ण ताबा घेतलेला आहे. सकाळी उशिरा उठल्याने सकाळच्या ताजेतवानी व उत्साह वर्धक हवेला मनुष्य मुकतो आहे. सकाळी सुर्याकिरणापासून मुक्तहस्ते मिळणारे डी जीवनसत्व उशिरा उठल्याने प्राप्त होत नसल्याने मनुष्याची हाडे ही कमजोर व ठिसूळ बनत चालली आहेत. कमी वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. सकाळी ऊठून शेतीवर जाणे बंद झाल्याने पायी चालण्याची सवय खंडीत झालेली आहे. शाळेकडून शारीरिक श्रम, कवायत करवून घेणे बंधनकारक नसल्याने मुलें ही कष्टीक राहिलेली नाहीत. थोडे जरी शारीरिक कष्ट केले तरी लवकर थकवा येतो.
आपल्या आजच्या दैनंदिन सवयीचा हा दुष्परिणाम आहे. डाॅक्टर मंडळी आज लहान सहान कारणास्तव औषधांचा मोठ्या प्रमाणावर डोस देतात. याचा वाईट परिणाम संपूर्ण शरीरावर होवून शरीराचा कोणता अवयव केंव्हा निकामी होईल हे सांगता येत नाही.
आजच्या संगणकीय युगात जन्माला आलेली मुलें ही कानास मोबाईल, हेडफोन्स लावूनच जन्माला येतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा परिणाम किती वाईट असू शकतो याचा विचार पालकवर्ग करीत नाहीत. आजची सकाळी लेट ऊठण्याची व झोपण्याची संस्कृती ही जुन्या वळणाच्या लोकांना त्रासदायक वाटते आहे. यातून शाब्दिक संघर्ष निर्माण होतात. आपली सकाळी पहाटे उठून कामें करण्याची सवय तुटल्याने आपले शरीर कष्टीक काम करण्यास धजावत नाही. शेती करणे हे कष्टीक काम आहे. यासाठी शरीर मजबूत हवे. नुसते पुस्तके वाचून मार्क्सचा डोंगर रचल्याने शेती होत नाही. पिक येण्यासाठी शेतीत प्रत्यक्ष राबावे लागते. शेतातला काडीकचरा काढून, जमिन नांगरुन, शेतीला आवश्यक पाणीपुरवठा करून शेती पिक घेण्यायोग्य करणे आवश्यक असते. शेतकरी कुटूंबातील लोकांना याची अंगी सवय लावून घ्यावी लागते. कसेल त्याची शेती असे म्हटले जाते ते उगाच नव्हे.
जशी सवय अंगी बाळगू तसे आपले शरीर बनणार आहे. चांगल्या सवयी अंगी बाळगणे हे वाटते तेवढे सोपे काम नाही. लेटलतीफ ची सवय अंगी बाळगल्याने सरकारी कामे वेळेवर होत नाहीत. वेळ आणि सवय याचा परस्पर संबंध आहे. वेळेचे महत्त्व जाणून जो काम करतो तोच जीवनात यशस्वी होत असतो.वेळ पाळणे हा आपल्या चांगल्या सवयीचा एक भाग आहे. चांगल्या व वाईट सवयी या प्रत्येकात असतात. चांगल्या सवयीचा स्विकार केल्याने मनुष्याची प्रगती होत असते. तर वाईट सवयीचा स्विकार केल्याने मनुष्याची अधोगती होत असते. हे माहीत असूनही मनुष्य वाईट सवयींचा लवकर स्विकार करतो. तर चांगल्या सवयींचा स्विकार करण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात. यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतात. हीच तर दुनियाची उरफाटी रीत आहे. कुणी कसे वागावे हे सरकार ठरवू शकत नाही. फक्त नियमांची रचना करून शिस्त पाळली गेली पाहिजे म्हणून दंडाचा धाक निर्माण करू शकते. चांगल्या सवयी अंगी बाळगून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे हे नागरिक म्हणून आपले हाती आहे.
* मिलिंद गड्डमवार , राजुरा
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment