● माझा देव ●
देवानंद नावाचे ग्रहस्त आमच्या शेजारी रहात होते. सदा चेहऱ्यावर हास्य असणारी व्यक्ती म्हणजे देवानंद. देव आणि आनंद यांचा जणू संगमच. नाव जरी देवानंद असले तरी श्रध्दा आणि अंधःश्रध्दा यातील सीमारेषा ओळखून त्यानुसार आपली वागणूक असावी असे त्यांचे ठाम मत होते.जनतेवर कुठलेही बंधने लादू नयेत त्यांना त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य उपभोगू द्यावे असे त्यांना वाटत असे. एके दिवशी दोन मित्रांत देव कशात असतो यावरून परस्परांत भांडणे जुंपली . तेवढ्यात देवानंद तिथे आले. त्यांनी दोघांनाही सांगितले की देव सर्वत्र असतांना तो लोकांना प्रत्यक्ष दाखविता येत नाही. त्याचा अनुभव हा चांगले कर्म करणाऱ्यांना चांगलाच येतो आणि वाईट कर्म करणा-यांना वाईट येतो. यावर दोघांचे एकमत झाले नाही. तेंव्हा देवानंदने सांगितले की समाधान हे मानण्यावर आहे. आपण देवाची आराधना ही मनुष्य मनाला शांती लाभावी यासाठी करीत असतो. देवालय , मस्जिद, चर्च, गुरूव्दार इत्यादी प्रार्थना स्थळी जाऊन मनःशांती लाभली असती तर लोकांनी आपले कामधाम सोडून फक्त देवालयात आश्रय घेतला असता. पण असे होत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी श्रम हे घ्यावेच लागतात.
जसे विचार आपल्या डोक्यात येतील तसेच कृत्य आपल्या हातून घडत असते . मग ते विचार चांगले असतील तर चांगले कृत्य हातून घडेल. अन वाईट विचार डोक्यात असतील तर वाईट कृत्य हातून घडेल. माझा देव अन तुझा देव हा सारखाच असून जो विद्यमान परिस्थितीशी लढण्याची शक्ती देतो ती शक्ती कशात आहे यावरून देवाचे अस्तित्व हे ठरत असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या किर्तनातून देवाचा बाजार मांडणा-यांना खडे बोल सुनावले आहेत. मज माणूस द्या मज माणूस द्या असे आवाहन त्यांनी केले होते.माणूस परिस्थितीशी झगडतांना जेंव्हा हतबल होतो तेंव्हाच त्याला देवाची आठवण होते. खरा देव हा माणसाच्या कर्मात दडलेला आहे. कुणी निसर्गात देव शोधतात.कुणी सजीव प्राण्यात देव शोधतात. मनुष्य प्राणी अशांत असल्यानेच तो शांतीसाठीच देवाचा आधार घेत असतो. कोणतेही काम मन लावून समर्पन भावनेतून केले तरच मनःशांती ही मिळत असते . दुसर्यांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेणे हा देवपूजेचाच एक भाग आहे. लोकांच्या मनाचा विचार न करता आज आपलेच घोडे जबरदस्तीने दामडले जात असल्याने लोकांच्या मनातील अशांततेत वाढ झालेली आहे. पैशाच्या हव्यासापायी मनुष्य मानवाचा दानव होत आहे. चार पिढ्यांची कमाई तो एकाच पिढीत करू पहात आहे.हेच खरे असंतोषाचे कारण आहे.हे माहित असुनही तो पैशाच्या मागे सतत धावतो आहे. श्रम ही है ,श्रीराम हमारा ! असे बाबा आमटे सांगून फक्त थांबले नाहीत तर हाताची बोटे गमावलेली माणसे एकत्र जमवून त्यांच्या कर्मातून आनंदवन सारख्या अफाट कार्याची निर्मिती करून आज महाराष्ट्राचे नाव सा-या जगात अजरामर केलेले आहे . आज श्रम न करता, घाम न गाळता पैसे कमविण्याची जणू शर्यतच लागलेली आहे.
शेतकऱ्यांचा देव मातीत आहे. मासेमारी करणा-यांचा देव पाण्यात आहे.आकाश भ्रमण करणा-यांचा देव वायुमंडलात आहे. सजीव प्राण्यांचे जीवन ज्या गोष्टींवर अवलंबून आहे त्यानुसार देवाची व्याप्ती ही ठरते आहे. मनुष्याच्या अंगी देवाचे गुणधर्म जेंव्हा दिसायला लागतात तेंव्हा मनुष्यातच खरा देव दिसायला लागतो. देव ही एक संकल्पना आहे.प्रत्येकाच्या विचारसरणी नुसार तो आकारास येत असतो. आपण कुठलेही श्रम, काम न करता आपले जीवन व्यतीत करीत असू तर मानवाचे जीवन हे व्यर्थ ठरत असते. मनुष्य जन्म हा चांगले कर्म करण्यासाठीच असतो. लहान मुला-मुलींमध्ये देवाचे स्थान असते.संपूर्ण सजीव सृष्टी ही निसर्गाने( देवानेच ) निर्माण केलेली आहे. जन्मापासून मरणापर्यंत कर्म करीत रहाने एवढेच मानवाच्या हाती आहे. कर्माला कुठलिही जात नसते.मनुष्याने आपल्या स्वार्थासाठी जात ही संज्ञा निर्माण करून आपले हीत साधलेले आहे.तेंव्हा देव हा कर्मातूनच शोधला गेला पाहिजे असे देवानंदचे ठाम मत आहे.जीवनातील आनंद उपभोगण्यासाठी आणि कठीण समयी दुखःशी तोंड देण्यासाठीच देवाची निर्मिती करण्यात आलेली आहे.त्याच्याकडे कोणत्या चष्म्यातून पहाण्यात यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे स्वातंत्र्य आपल्या राज्य घटनेने प्रत्येकालाच बहाल केलेले आहे.
जमिनीशी असणारी आपली नाळ तुटल्याने आणि मातीशी असलेले आपले इमान न राखल्यानेच आज शेतीची वाईट अवस्था झालेली आहे. कांदा-मुळा भाजी,अवघी विठाई माझी ही संत सावता माळी याची रचना आजही आपल्याला दिशादर्शन करते आहे.परंतू या विज्ञान युगात संताचे म्हणणे न ऐकल्यानेच आज आपल्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे. देव हा कर्मातूनच शोधावा लागतो. तो इतर ठिकाणी असू शकत नाही. असेच आपल्या संतांचे सांगणे आहे. आपले जीवन सुखकारक करण्यासाठी कर्माशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊनच आपले जीवन व्यतीत करीत रहावे. तरच ख-या देवाचे दर्शन होवू शकते.यातच मनुष्य जीवनाची इतीकर्तव्यता दडलेली आहे.
मिलिंद गड्डमवार
' मधु कुंज ' निवास
आसिफाबाद रोड, राजुरा
जिल्हा-चंद्रपूर
भ्र.क्र. ९५११२१५२००
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment