आज शासनाला ३३ कोटी वृक्षांची लागवड करण्याची
काय गरज भासली याच्या खोलात गेले की एक निदर्शनास येणार सत्य असे की मनुष्यप्राणी स्वतःच्या
स्वार्थासाठी वृक्षाची सर्रास तोड करतोय, मोठाल्या इमारती बांधण्यासाठी जंगले जमीनदोस्त
करतोय. आणि दिवसेंदिवस ओझोनचा पृथ्वीवरील थर कमी होत आहे आणि यातूनच तापमान वाढ, अवर्षण,
जंगली प्राण्यांचे मानवाच्या वस्तीवर हल्ले अशा समस्या निर्माण होतांना दिसत आहेत.
यावर उत्तर काय?
सर्वात महत्वाचा प्रश्न जर लहानपणी मुलं मातीचा किल्ला बनवणे, शंख शिंपले
जमा करणे, मामाच्या गावाला जाणे, बालगीते म्हणणे यामध्ये व्यस्थ असतात, त्यांचा स्वभाव
निरागस असतो मग अचानक वृक्षतोडीचा अविचार येतोच कुठून?
दंत कथांमध्ये
खूप ताकद असते, लहान मुल झोपत नसेल तर आपण त्याला भोकाडी, भूत, धारीबाबा यांच्यानावाने
भीती दाखवत शांत करून झोपी लावण्याचे काम करतो, चारित्र्य उत्तम बनवण्यासाठी चारित्र्यपुरुषोत्तम
रामाच्या, आणि श्रीकृष्णाच्या गोष्टी आजी आजोबा सांगत असतात, अशीच एक लहानपणी शाळा
आणि आजीआजोबांनी मुलांना चांगले संस्कार लागावे म्हणून प्रामाणिक लाकूडतोड्याची गोष्ट
सांगितलेली असते आणि आजदेखील सांगतात, त्या गोष्टीबद्दल मी आज खूप विचार केला आणि माझ्या
लक्षात आले की त्या गोष्टीचा लहान मुलांच्या मनावर परिणाम झाला आणि मुले खरं बोलायला
लागले.
प्रामाणिक लाकूडतोड्याची गोष्ट अशी आहे, एक लाकूडतोड्या
रोज झाडे तोडून त्याची मोळी विकून उपजीविका करत असतो. नेहमीप्रमाणे तो झाडे तोडून मोळी
तयार करण्यासाठी झाड तोडत होता अचानक त्याची कुऱ्हाड विहिरीमध्ये पडते आणि तो रडत बसतो.
आणि देवाला विनवणी करतो, जलदेवता प्रसन्न होते आणि त्याला विचारते काय झालं? त्यावर
तो लाकुडतोड्या झालेली घटना देवीला सांगतो, देवीला त्याची दया येते आणि देवी विहिरीमधून
सोन्याची कुऱ्हाड आणते आणि त्यावर तो लाकुडतोड्या म्हणतो हि माझी कुऱ्हाड नाही, देवी
परत चांदीची कुऱ्हाड आणते तो परत सांगतो हि माझी कुऱ्हाड नाही नंतर देवी परत विहिरीमध्ये
जावून लोखंडी कुऱ्हाड आणते त्यावर लाकुडतोड्या म्हणतो देवी हि माझीच कुऱ्हाड आहे, देवी
प्रसन्न होते आणि त्याला तीन्हीपण कुऱ्हाडी बक्षीस देते.
यागोष्टीने प्रामाणिक राहावे हा जरी संदेश मिळत
असला तरी आजच्या पिढीने वेगळा संदेश घेतला देवी लाकूड तोडणाऱ्याला मदत करते म्हणून
वृक्षतोड बिनधास्त करा.
मी संपूर्ण समाजाला एक आवाहन आवाहन करतो की, आपल्या
लहान मुलांना गोष्ट सांगतांना आता निसर्ग संवर्धनाच्या गोष्टी सांगाव्यात आणि लाकुडतोड्याच्या
गोष्टीचा अंत थोडा वेगळा करावा देवीने त्याला कुऱ्हाडी देण्याऐवजी त्याचे हात तोडले
असते तर......? तर एक भीती निर्माण होईल आणि लहानपणापासून निसर्ग संवर्धनाचा एक विचार निर्माण होईल.
माझ्या विचारावर आपणही विचार करावा, वन आणि कृषी
विभाग महाराष्ट्र शासन यांच्या हरित सेना उपक्रमात सहभागी व्हा. प्रत्येक वाढदिवसाला
एक वृक्ष लावा आणि त्याला जगवा एवढंच केल तरी आपली पुढची पिढी निरोगी श्वास घेऊ शकेल.
लेखण : सौरभ सुभाष केदार
एक निसर्गप्रेमी
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment