“हजार दिवस कसून अभ्यास करण्यापेक्षा आदर्श शिक्षकासोबत एक दिवस घालवणे अधिक श्रेयस्कर आहे.” हे वाक्य मी वाचले अन क्षणभर विचार केला अन लगेचच थोडंस सुचल म्हणून लिहायला बसलो.
सब धरती कागज करूँ, लिखनी सब बनराय।
सात समुद्र की मसि करूँ, गुरु गुण लिखा न जाय॥
या कबीरांच्या डोह्याप्रमाणे गुरूंची महिमा अवर्णनीय आहे, गुरूला ब्रम्हांडामध्ये मोलाच स्थान आहे, अन गुरुशिवाय कोणाच्याच जीवनाची नौका पार होऊ शकत नाही. गुरु म्हणजे आजच्या २१ व्या शतकातील शिक्षक होय. सदर लेख मी सर्व गुरुंना समर्पित करत आहे.
शिक्षकांचा पेशा, ‘सर्वात महत्त्वाचा पेशा’ आहे असे म्हटले जाते. काही शिक्षकांना पाहिल्यावर हा पेशा अगदी आरामदायी आहे असे भासत असले तरीसुद्धा, वास्तवात शिक्षकी पेशाच्या अडचणीची तुलना ही मॅरथॉन स्पर्धेशी करता येईल, परंतु हे कबूल करावे लागेल की, त्यांना असंख्य अडीअडचणी, आव्हाने, आणि निराशा यांना तोंड द्यावे लागते यामध्ये तुटपुंजा पगार, भरमसाट पेपर-वह्या तपासणे, अधिक लेखी काम, जाचक व्यवस्थापन पद्धती, अमर्याद विद्यार्थी, विद्यार्थी होत असलेला अनादर, विद्यार्थ्यांची हिंसक वागणूक, शिकवण्यासाठी मिळालेले निकृष्ट वर्ग, प्रतिसाद न देणारी मुले या सर्वांचा समावेश होतो. अशी वस्तुस्थिती असूनही संपूर्ण जगभरामध्ये लाखो शिक्षक आपण निवडलेल्या या पेशाला चिकटून राहतात. मग या सर्वांना कशामुळे प्रेरणा मिळते?, या सर्व आव्हानांना शिक्षक कसे तोंड देतात? “शिक्षकांकडून इतक्या प्रचंड अपेक्षा केल्या जातात, पण आपण शाळा/महाविद्यालयातल्या समर्पित शिक्षकांना प्रशंसेचे दोन शब्द वापरतो का?” याचाही विचार व्हायला हवा. अन खूप बारीक विचार केल्यावर लक्षात आले की, “शिक्षक असणं नक्कीच सोपं नाही. बराच त्याग करावा लागतो. पण सर्व अडचणी असूनही, शिक्षकांना विचारलं तर ते नक्कीच सांगतील की, व्यावसायिक जगातील इतर कोणत्याही नोकरीपेक्षा शिक्षकाचं काम अधिक संतुष्टीदायक आहे.”
मी कुठेही गेलो तरी बोलका असल्याने लगेच प्रत्येक क्षेत्रातील बारकावे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, अशीच काही शिक्षकांसोबत चर्चा झाली आणि त्यामधून एक शिक्षकी पेशातील महत्वाची समस्या मनाला स्पर्श करून गेली ती समस्या अशी होती- पूर्वीसारखा हल्लीच्या मुलांना शिक्षकांविषयी अजिबात आदर राहिलेला नाही.” पूर्वी समाजात शिक्षकांना सर्वात जास्त आदर दिला जात होता. समाजात लहानथोर त्यांना आपला आदर्श मानत असत. पण आज हा आदर नाहीसा होऊ लागला आहे. त्यापाठीमागे पाश्चात्त्य संस्कृती हळूहळू लहान मुलांच्या कोवळ्या मनांवर परिणाम करू लागली आहे, सैराट सारखे चित्रपट(शिक्षकांवर हात उचलणे), असंख्य व्हिडिओ यामधून शिक्षकाच्या अधिकारास न जुमानणे हे शौर्याचे लक्षण असल्याचे दाखवले जाते. यामुळेच संपूर्ण समाजातच विद्रोहाची आणि आज्ञा मोडण्याची वृत्ती पसरली जात आहे आणि अर्थातच मुलेही यातून सुटलेली नाहीत.
आज सर्व पालक एक वाक्य कायम वापरतात की मी माझ्या मुलासाठी हवी तितकी फीस भरेल पण मी त्याच संस्थेत मुलाला दाखल करेल, पण असे करत असतांना विसरून जातात, ठराविक संस्था पैशासाठी वर्ग फारच मोठे करतात! काही ठिकाणी वर्गात खूप विद्यार्थी आहेत यामुळे समस्या असलेल्या विद्यार्थ्यांकडे शिक्षक खास लक्ष देऊ शकत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. वैयक्तिक गरजांची दखल घेता येत नाही. शिक्षकांचा तुटवडा असतो. त्यामुळे एक शिक्षक दोन किंवा त्यापेक्षा अधिक विषय शिकवतो. पर्यायाने विद्यार्थ्याला आपण आपल ज्ञान देवू शकलो नाही ही सल मनात घर करून राहते.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये संगणकाने सगळीकडे आपली स्वातंत्र्य जागा निर्माण केली आहे. यामुळे प्रत्येकालाच गुरु बदलतांना दिसत आहे. एकेकाळी अडचणीत असल्यावर उच्चशिक्षित गुरूंचा सल्ला घेतला जाई. आता चित्र पालटले आहे, आता कोणालाही काहीही अडचण आली तर मुख्यत: तरुण लगेच संगणकाचा आधार घेतात. काळानुसार गुरु बदलत जरी असला तरी संगणक संस्कार देऊ शकत नाही. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शिक्षकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
अशा एक नव्हे तर अनेक समस्या असून शिक्षक आपल्या पेशावर ठाम का आहेत याचाही थोडासा विचार केला अन जाणवलं की, क्वचितच घडणाऱ्या लक्षणीय, विक्रमी विजयांपेक्षा दररोजच्या लहानसहान गोष्टींमुळे, विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या यशांमुळे शिक्षकांना जास्त समाधान मिळते. अनेक शिक्षक काठीच्या आधाराने चालत असतात आणि विद्यार्थी रस्त्यावर किंवा इतरत्र अचानक भेटतात आणि त्यांनी शिकवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हा सगळ्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटते. तर काही शिक्षकांना आपल्या जीवनाचा काही काळ मी या अप्रतिम पण अवघड व्यवसायाला समर्पित केला याचे सर्वात मोठे समाधान मिळते तर काहींना मी शिकवलेली चिमुरडी मुले काही प्रमाणात माझ्या प्रयत्नांमुळे मोठेपणी यशस्वी स्त्रीपुरूष बनली आहेत हे ऐकून जीवनच चीज झाल्याच समाधान व्यक्त करतात.
अशा निस्वार्थी भावाने विद्यार्थ्याचे जीवन घडवणाऱ्या शिक्षकांना तुम्ही कधी विद्यार्थी या नात्याने त्यांनी खर्च केलेल्या वेळेबद्दल, शक्तीबद्दल आणि दाखवलेल्या आस्थेबद्दल आभार व्यक्त केले आहेत का? किंवा निदान धन्यवाद मानणारे एखादे लहानसे पत्र तरी लिहिले का? नसेल तर उठा अन आत्ताच शिक्षकांना कृतज्ञतापूर्वक दोन शब्द किंवा मनातील भावना व्यक्त करणारे पत्र लिहा कारण, “शिक्षकांनाही प्रशंसेची गरज असते. सरकार, पालक आणि विद्यार्थी या सर्वांनी त्यांचा आणि त्यांच्या सेवेचा परम आदर केला पाहिजे.”
आता माझ्या भावनांना विराम देतो पण शिक्षकांच्या समस्या जाणून घ्या, त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांना शुभेच्छा संदेश पाठवा, त्यांचा आदर करा, नवीन गोष्टी शिका, खूप आभार व्यक्त करा, कायम कृतज्ञ राहा. एवढंच केल तर आपण खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केली असे म्हणता येईल.
सर्व गुरुजनांना साष्टांग दंडवत आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला शिष्य.
सौरभ सुभाष केदार
No comments:
Post a Comment
Thank You For Visit and Comment